मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Wednesday, April 22, 2015

पाणीपुरी पुराण

"छ्या !! हा काय पदार्थ झाला ?? पुरीत पाणी टाकून खायचं म्हणे !!" 
"बरं झालं..... लग्न झाल्यावर, पोरं झाल्यावर असे म्हटलेस ते !! नाहीतर कठीणच होते तुझे !!" नवर्याला धमकीवजा उत्तर. पण या उत्तराने नवर्याचा पाणीपुरीकडे बघायचा दृष्टीकोन बदलला हे नक्की !! आणि तोही या सत्कर्मात आवडीने आमची सोबत करू लागला. तसे पाहिल्यास मीच नाही तर समस्त स्त्रीयांचा निदान ९९% "पाणीपुरी" हा आवडता पदार्थ !! ज्या अगदीच हेल्थ कॉन्शस वैगरे असतात त्या 10 रुपये ऐवजी ५० रुपयांची मिनरल वॉटरवाली पाणीपुरी खातात पेज थ्री वाल्या शॉट्स खातात. म्हणजे पाणी काय दारू काय पुऱ्या एकच !! 
माझा पाणीपुरी प्रवास नेमका कसा व कुठे सुरु झाला आठवत नाही पण LAD कॉलेज चौक, धरमपेठ, बजाज नगर, मेडिकल चौक, महाल, मोदी नं 2,3, ते थेट चेंबूरचा कॅम्प, दादर स्टेशन, चौपाटी, कल्याण........ सोनार आळी, कपडा लेन,....... सुलतान बाजार, बडीचौडी, दादुज, अगरवालाज, मयूर, डिम्मी, महाराज कि बंडी..... असा अनेक गावातील -  शहरातील गल्लीबोळातून, लग्न सभारंभातून आजतागायत सुरु आहे.
१९९० साली कॉलेजला फेस्टमध्ये आम्ही पाणीपुरीचा स्टोल लावला होता. महेश एलकुंचवार सर आलेत... त्यांना खूप आग्रह केला... खूप छान पाणीपुरी आहे सर, सर्वांनी खाल्लीय.... सर प्रश्नार्थक ??? ही अशी पाणीपुरी खायची असते का कधी स्टीलच्या भांड्यातून चमचाने पाणी टाकून  ?? पाण्याचा एक मोठ्ठा माठ हवा.. कधी न धुतलेला, त्यात काळ्या हाताने ढवळून पुरी बुडवायची नि अश्शी प्लेटमध्ये..... तात्पर्य काय सो कॉल्ड पाणीपुरीच्या पाण्याचे कुणीही कितीही हिडीस वर्णन केले अगदी टीव्हीवर भैयाने माठात मुतलेले दाखविले तरीही "पाणीपुरी" आपले स्टेटस राखून आहे. आणि बायकांचे नाव जरी बदनाम करत असले तरीही कितीतरी पुरुषार्थ पाणीपुरी मटकवतांना दिसतो. 
आता आमचे पाणीपुरीचे वेड किती तर २४*७ आमच्याकडे डबाभर पाणीपुऱ्या आणि फ्रीझमध्ये थंड पाणीपुरीचे पाणी असतेच.  मध्ये एक वर्ष सुट्टी दिली होती पण ते वर्षही चुटकीसारखे उडून गेले. मागे अनेक चुटकुले ठेवून... 
(पाणीपुरी आख्यान - क्रमश:)
- विशाखासमीर