मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Tuesday, December 30, 2014

2015 शुभेच्छा !!

एक जीवन... दोन पावलांवर खेळणारं..
दिवसागणिक 2-2 पावलं जोडत जाणारं... एक साखळी.... विराट विश्व ... असंख्य पावलांचं !!
कधी या असंख्य पावलांसोबत, कधी त्यांच्या मागे, कधी पुढे, आपली दोन पावलं मिरवायची!!
कधी पुढे जाण्यात दु:ख तर कधी मागे राहण्यात आनंद !!
छोट्या छोट्या पावलांचे कौतुक तर मोठ्या पावलांचा कधी आदर कधी धाक तर कधी आधार!!
प्रत्येक पावलाचे ठसे वेचण कठीण. प्रत्येक ठसा वेगळा. आपली ओळख जोपासणारा. प्रेमानं बिलगणारा, त्वेषानं झिडकारणारा, तरीही दुर्लक्षीत कधी कधी!!
माझ्या असंख्य जाणिवा कवेत घेवून चालणारी माझी पावलं, सोबत असणाऱ्या साऱ्या साऱ्या कडू गोड आठवणींचे बोचके घेवून उद्या नविन वर्षात पदार्पण करणार...
तारीख बदलतांना .... वर्ष उलगडतांना अशी अनेक पावलं माझ्यासोबत येवून उभी राहणार काही जुनी काही नवी...
मग पुन्हा सुरु होईल धावाधाव !!
मागे पुढे होतील पावलं... कळत - नकळत ठसे होतील रंगीबेरंगी !! खुलु लागतील स्वप्नं, चमकु लागतील डोळे, भिजतील आनंदाश्रुत दिवसागणिक प्रत्येक क्षण !! सापडेन मीच मला माझ्या अस्तित्वाच्या छायेत !!
दवबिंदुंचे आंगण त्यावर चांदण्यांचा सडा !!
सतारीच्या तारांवरून हळुवार झंकारणारी पावलं आणि त्या नादविश्वात मी जगलेले माझे "मी" पण!!
आपणा सर्वांचे २०१५ हे वर्ष सुरेल व्हावे नि प्रत्येकाला आपला सूर गवसावा हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!!


Saturday, December 20, 2014

बाबा

ही सहा महिन्यांची गरोदर... अचानक हिला जाणीव होते नवऱ्याच्या भयाण आजाराची. आज पर्यंत हा साधा खोकलाच वाटायचा तिला म्हणून ती आणि घराचे सारे निर्धास्त होते. हे जीवघेण आजारपण... आपल्या या पोटातल्या बाळाचा तर पायगुण नसेल ?? म्हणून सिद्ध झाली ती बाळ पडायला...... भरपूर रानटी औषधपाणी झाले. पण बाळ नशीब घेवून आलेलं ... चिवट ... कुठल्याही औषधाचा फरक पडला नाही.. आणि....
पाच भावंडांच्या पाठीवर एक सहावं बाळ तिच्या पोटी जन्माला आलं. तेव्हा नवऱ्याची तब्येत अजून बिघडलेली....  हिचा स्वभाव भयंकर.. काहीतरी डोक्यात घेवून बसलेली... त्यामुळे बाळाला पाजायलाही तयार नाही. हिची मोठी मुलगी... वय वर्षे अवघे १२... नौकारांकडून गायीचे दूध काढून या तान्हुल्या भावाला बोळ्याने दूध पाजू लागली.. अवघ्या ६ महिन्यांचा असतांना वडील सोडून गेलेत.  
वडिलांच्या मुळावर असलेले हे नाराजीचे बाळ .... आपल्या ५ भावंडांसोबत वाढू लागलं. स्वाभिमानी आई .... सासरच्या वागणुकीने जराही डगमगली नाही. आपल्या सहा मुलांना घेवून तिने माहेर गाठले... शिक्षणाबद्दल अत्यंत आवड म्हणूनच बरीस्टरशी लग्न केलेले.... मुलांनीही आपल्या वडिलांसारखे शिकून मोठे व्हावे अशी दुर्दम्य इच्छाशक्ती. शिक्षणाकरता मुलांना माहेरी ठेवले. सर्व मुले प्रतिकूल परिस्थितीत शिकलीत. लहान मुलगाही शिक्षणाची आस लावून.... त्याला नुसते पदवीधर नाही तर इन्जीनीअर व्हायचे होते. भावंडांनी हिम्मत बांधली... पण नुसत्या हिमतीवर काही होत नसते... त्याला पैशांचीही जोड लागते... इकडे फी भरायची वेळ आली आणि आई फी भरायची म्हणून कापूस विकायला गेलेली... शेवटचा दिवस... हातात पैसे नाहीत.. काय करणार... सर्व स्वप्न उध्वस्त होत असलेली दिसतांना अचानक एक मित्र समोर आला...त्याच्या वडिलांनी फी चे पैसे दिलेत... आई धापा टाकत संध्याकाळी आली. आणि मित्राचे पैसे वापस केले. ज्या शेतीमुळे आपल्याला मित्रासमोर हात पसरावे लागले त्या शेतीवर पुन्हा जायचे नाहीच... अशी घृणा मनात घर करून बसली. आणि मग ५० वर्ष याने शेतीकडे बघितले देखील नाही. इंजिनियर होवून पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मधला भाऊ संघाचा प्रचारक, आणीबाणीत मोठ्या भावाची नौकरी गेली. त्याचा संसार सांभाळला. याच्यापेक्षा मोठी असली तरी घरात लहान असलेल्या बहिणीचे लग्न... अचानक आलेल्या नवऱ्याच्या आजारपणाने विखुरलेला मोठ्या बहिणीचा संसार सांभाळला. या सर्व दिव्यातून निघाल्यावर घरच्यांनी याच्या लग्नाचा विचार केला.
लग्न झाले... एक मुलगा दोन मुली .... सरकारी नौकरीत एव्हाना ऑफिसरचा थाट.... दर तीन वर्षांनी बदली झाली तरी टुमदार घर, सरकारी गाडी, ड्रायव्हर, नौकर चाकर. आई आणि भावंडांना भारीच कौतुक. आपल्या ताकदीवर उभ्या असणाऱ्या लहान भावाच्या घरी हक्काने महिना दोन महिने राहायचे.
माझे बालपण ज्या काबाडकष्टात गेले... लोक ज्या हीन दृष्टीने काहीच चूक नसतांना आमच्याकडे बघायचे त्या कुठल्याही गोष्टीची सावली माझ्या मुलांवर मी पडू देणार नाही असे छातीठोकपणे म्हणणारा एक बाप.... मुलांच्या तोंडून निघालेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या पुढ्यात आणून टाकणारा... मुलांसोबत प्रत्येक खेळ खेळणारा... हुंदडणारा आमचा हरहुन्नरी बाबा...
बाबा खरंच कित्ती आणि कसले कसले हट्ट पुरविलेत तुम्ही आमचे.... आंब्याच्या रासाशिवाय मी जेवणार नाही असा माझा पणच असायचा..... आम्ही नागपूरला असलो कि आजही तुम्ही आमच्याशिवाय जेवत नाहीत. कितीही वेळ झाला तरी थांबून असता... 
कोणी आम्हाला विचारले तुमचे बाबा कसे ?? तर क्षणभर आम्हालाही प्रश्नच पडतो.. भारतात पहिल्यांदा रेडीयम रोड  डिव्हायडर्स आणणारे एक इंजिनियर, एक ऑफिसर, एक समाजसेवक, कि अटलजींची भाषणे, मुरारी बापूंची प्रवचने अस्खलीत म्हणून दाखविणारे कि भीमसेन जोशी,वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकीची गाणी तासंतास ऐकणारे, त्यांच्या कार्यक्रमात देहभान होवून बसणारे, संघाच्या शाखेत दररोज जाणारे, आपल्या पगारातील दरमहा गुरुदक्षिणा बाजूला ठेवणारे, ज्ञानेश्वरी – दासबोध – गीतेचे अभ्यासक, कि अजूनही वेगवेगळ्या चाली लावून पेटी वाजविणारे संगीतप्रेमी कि राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या विषयावर बेमालूम चर्चा करणारे क्रिकेटप्रेमी ... कि अग, त्याला किती त्रास द्यायचा म्हणून ड्रायव्हरला घरी बसवून इलेक्ट्रिक बिल भरायला जाणारे..
माणुसकी जपणारा एक देव माणूस म्हणजेच आमचे बाबा...        
बाबा म्हणून लोक जे काही करतात त्यापेक्षा काकणभर तुम्ही जास्तच केलेत आमच्या करता.... म्हणून आजही कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगायला आम्ही घाबरत नाही...लोक “वडिलांचा धाक” हा शब्द वापरतात पण आम्ही तो कधीच अनुभवला नसल्याने या शब्दाबद्दल खूप कुतूहल आहे अजून. आई आणि बाबा या दोघांमध्येही समतोल.... कधीच घरात भांडे वाजले नाही... म्हणूनच एका मस्त वातारणात आम्ही जगलो... वाढलो...

Saturday, December 13, 2014

करमनघाट

लग्न झाल्यापासून म्हणजे गेल्या २० वर्षांपासून इमाने इतबारे आम्ही दोघेही नवरा बायको एक व्यसन जोपासत आलो.... शनिवार - रविवार नवीन नवीन जागा शोधायच्या आणि मस्त पैकी रस्ता विचारात कधी रस्ता विसरत तिथे पोहोचायचं... पहिले नेट नव्हत... तेव्हा पुस्तके, वर्तमान पत्रे वाचून आमचा हा शौक पूर्ण करायचो आता तर काय नेट चे जाळेच !! मग साधारण बुधवार गुरुवार पासून आमची शोधाशोध सुरु होते !! 
असाच शोध लागला.... "करमनघाट" च्या हनुमान मंदिराचा... मंदिर हैद्राबादेतच पण आमच्या घरापासून १५ - २० किलोमीटरवर.... "करमनघाट" - नावातच याचा इतिहास दडलेला ... औरंगजेब या मंदिरावर चालून गेला... तेव्हा या मंदिरातून सर्व पळून गेलेले... तरी आतून जोर जोराने आवाज आला.... "मंदिर तोडना है राजन तो कर मन घट" औरंगजेब घाबरला आणि तिथून पळून गेला....
या गोष्टीने आम्हाला झपाटून टाकले आणि १२ व्या शतकात राजा काकातीयाने बांधलेले हे मंदिर बघायला निघालो..... भव्य विस्तृत मंदिर परिसर, पवित्र स्वच्छ वातावरण, भक्तिमय दाही दिशा ... बस दिन बन गया !!
दर्शन घेवून आम्ही बाहेर आलो... तर काय... पालखीत बसून हनुमानजी मंदिर बंद होण्याआधी श्री रामरायाच्या दर्शनाला राम मंदिरात... शहनाई, मृदंग, टाळ, चिपळ्या... अहाहा ... काय सोहोळा होता.... प्रभू सियावर रामचंद्र कि जय.... जय बजरंगबली !!
Karmanghat Hanuman Temple is located at Karmanghat, closer to Sagar Ring Road, it is a temple of Lord Hanuman. It is one of the oldest temples in the city.
It was built in 12th century A.D (approximately 1143). When a Kakatiya king went hunting and was resting under a tree, he heard the chanting of Lord Rama's name. Wondering who it was in the middle of a dense forest, he discovered a stone idol of Lord Hanuman, in seated posture and the voice coming from the vigraha. Having paid his respects, he returned to his capital, and that night, Lord appeared in his dream and asked him to construct a temple.
The temple was built immediately and successive kings ruled it well. About 400 years later, Aurangzeb sent out his armies to all corners of the country to wipe out Hindus and Hindu temples. At this temple, the army couldn't even step close to the compound wall. When the general reported this to Aurangzeb, he himself went with a crow bar to break down the temple. At the threshold of the temple, he heard a deafening roar rumblning like thunder, and the crowbar slipped from his hands as he was shaking in fear. Then he heard a voice in the heavens "Mandir todna hai rajan, to karo man ghat" ("if u want to break down the temple king, then make ur heart stronger") which is why the place got the name kar-man-ghat. And to this day, Lord Anjaneya sits peacefully meditating and blessing devotees, as Dhyana Anjaneya Swamy.

Thursday, December 11, 2014

धावपळ

आज पुन्हा भावनांचा
तोच गोंधळ तोच कल्लोळ
आणि स्वत:चा शोध म्हणून
केलेली जीवघेणी धावपळ.....
थांबशील जरा मना इथे ??
अरे आत्ताच कुठे उलगडू लागलेत
सारे हवे नको ते संदर्भ
ती कामापुरती नाती अन
त्याच गोतावळ्यात अडकलेले
अन न अडकल्याचे केलेले नाटक
रोज कुठल्यातरी जन्मजात वास्तुचे
नि वस्तुचे आकर्षण.....
त्या मागे धावतांना होणारी धडपड
नि ती हृदयाची धडधड
सर्व गोष्टींचा संबंध असून असंबद्ध
कोण कुठे आणि कसे
कसलाच कशाशी ताळमेळ नाही
तरी हातात हात धरून
लयीत चालणारी ही दुनिया....
झपाटलेले विस्कटलेले सारेच
तो बेताल ताल अन ती सुरात तान
साराच गोंधळ साराच कल्लोळ
नुसतीच धावपळ नुसतीच धावपळ
- विशाखासमीर

सारीपाट

जीवनाचा सारीपाट ...
सर्वात सोप्पा खेळ 
कारण.....
कधीच नसतो कुठलाच मेळ 
उसने टेंशन घ्यायचे म्हणता ???
अहो,
या पटावर आपल्या फक्त सोंगटया
खेळवणारा कोणी दुसराच...
सतत टेंशन ....
आपल्या खेळीने कोणाला काय वाटेल ??
फक्त सोंगटया आपल्या असतात
फासे टाकणारा दुसराच
त्याचे सोयर सुतुक करणारा तिसराच ...
पुन्हा एक टेंशन.....
सोंगटया आपल्या असतात ???
कायम ???
कि त्या रक्ताच्या म्हणून आपल्या म्हणायच्यात ??
वयानुसार स्वभावगुण बदलणारया सोंगटया
मग त्यांच्या वाढत्या वयाबरोबर
आपणही वाढतोय... नियमानुसार
अन लगेच दिसू लागतो दुसरा सारीपाट ....
त्यांनी मांडलेला....
आपल्या भोवताल त्या प्रत्येक सोंगटीचा एक सारीपाट
आठ दिशांना आपल्या भोवताली सजलेले
अचानक आपल्याच सोंगटया सारीपाटा बाहेर
एक सोप्पा खेळ खेळतांना
सोप्पाच असतो न हा खेळ ???
आणि श्रीमंत सुद्धा ...
आपले फासे टाकण्याचे श्रम आपल्याला नसतात
आपोआप ते पडत जातात.....
प्रत्येक मिनिटाला..
प्रत्येक तासाला ...
प्रत्येक दिवसाला...
हळू हळू आपल्या भोवताली ....
या सर्व सारीपाटांचे एक मोठ्ठे मैदान होते...
आणि त्यावर सुरु होतो मदाऱ्याचा खेळ
त्याची बडबड ऐकू येणार नाही इतके आपण बहिरे...
तो काय म्हणतोय ते समजत नाही ....
म्हणून आपण वेडे....
बिनकामाचे म्हणून फेकला जातो जीव ....
कुठेतरी अंधारात...
मग मिटून घ्यायचेत डोळे तसेच ....
हळूच शिरायचे स्वप्नांच्या कुशीत ....
स्वप्नात आपलाच सारीपाट आपल्याच सोंगटया नि आपलेच फासे ...

- विशाखासमीर

Wednesday, December 10, 2014

तुज पंख दिले देवाने ....

काय ग ?? कसले नाटक चालवलेस ??? खूप आव आणतेस आजकाल सुखी असण्याचा.खरंच आहेस तू सुखी ?? वर्षभर राब - राबराबल्यावर दोन - चार साड्या तुझ्यावर भिरकावल्या जातात आणि तू आनंदाने उडू लागतेस. हेच का तुझे सुख ?? तुझे भरदार व्यक्तिमत्व बोथट करून शालीनतेच्या शालीत लपेटून टाकलेय तुला. नाही का गुदमरत तुझा जीव?? अग, कर्तव्य आणि कैद यातील फरक कधी कळणार तुला ?? सकाळ संध्याकाळ नटून थटून बसणारा "शो -पीस" अशी का ओळख निर्माण करण्याचा चंग बांधला आहेस??? 
का असे सुरु केले आहेस कोरे आयुष्य ???अग, आजवर भरपूर लिहिले आहेस तू त्यावर.... तुझे शिक्षण, तुझे व्यक्तिमत्व, तुझे वेगळेपण, तुझी ओळख सांगणाऱ्या तुझा हजारो खुब्या.... नको कोंडून घेवूस स्वत:ला त्या पिंजऱ्यात. अग, उंच उडणाऱ्या घारीचेही लक्ष असतेच ना आपल्या पिल्लांवर?? आणि उंच उडायला घर सोडले पाहिजे असे थोडीच आहे. नको ओढून घेवूस परीघ स्वत:भोवती.
दिवसभर तत्वाच्या गोष्टी सांगतेस आणि रात्री आपल्याच पांघरुणात शोधत बसतेस आपलेच अस्तित्व !!
मान्य !! परिघात तू सुंदर रांगोळी सजवलीस. त्या रंगात विश्वास जागव आणि चमकव तुझे व्यक्तिमत्व त्या परिघाबाहेर. फुलू दे तुझ्यातील "तू " आणि मग बघ दरवळू लागेल तुझा परिघही तुझ्या सुगंधाने.... तुझा सर्वात आवडणारा सण आलाय. लक्ष लक्ष दिव्यांचा साज लेवून. तुझ्या ओटीत त्या दिव्यांचे तेज घालायला. निघ परिघाबाहेर... एक श्वास घे मोकळा.... तुझ्या हृदयात तेवणाऱ्या त्या दीपाला आश्वस्त कर. एक उ:श्वास घे तुझ्या “मी” पणाचा. कर्तृत्वाची जाणीव होऊ दे तुझ्या मनाला. आणि बघ जबाबदारी आणि कर्तृत्वाच्या समन्वयाने कसे दिपून जाईल सारे विश्व ... आता अजून फक्त एव्हढेच म्हणेन ...  
“तुजपंख दिले देवाने .... कर विहार सामर्थ्याने...”