मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Wednesday, December 10, 2014

तुज पंख दिले देवाने ....

काय ग ?? कसले नाटक चालवलेस ??? खूप आव आणतेस आजकाल सुखी असण्याचा.खरंच आहेस तू सुखी ?? वर्षभर राब - राबराबल्यावर दोन - चार साड्या तुझ्यावर भिरकावल्या जातात आणि तू आनंदाने उडू लागतेस. हेच का तुझे सुख ?? तुझे भरदार व्यक्तिमत्व बोथट करून शालीनतेच्या शालीत लपेटून टाकलेय तुला. नाही का गुदमरत तुझा जीव?? अग, कर्तव्य आणि कैद यातील फरक कधी कळणार तुला ?? सकाळ संध्याकाळ नटून थटून बसणारा "शो -पीस" अशी का ओळख निर्माण करण्याचा चंग बांधला आहेस??? 
का असे सुरु केले आहेस कोरे आयुष्य ???अग, आजवर भरपूर लिहिले आहेस तू त्यावर.... तुझे शिक्षण, तुझे व्यक्तिमत्व, तुझे वेगळेपण, तुझी ओळख सांगणाऱ्या तुझा हजारो खुब्या.... नको कोंडून घेवूस स्वत:ला त्या पिंजऱ्यात. अग, उंच उडणाऱ्या घारीचेही लक्ष असतेच ना आपल्या पिल्लांवर?? आणि उंच उडायला घर सोडले पाहिजे असे थोडीच आहे. नको ओढून घेवूस परीघ स्वत:भोवती.
दिवसभर तत्वाच्या गोष्टी सांगतेस आणि रात्री आपल्याच पांघरुणात शोधत बसतेस आपलेच अस्तित्व !!
मान्य !! परिघात तू सुंदर रांगोळी सजवलीस. त्या रंगात विश्वास जागव आणि चमकव तुझे व्यक्तिमत्व त्या परिघाबाहेर. फुलू दे तुझ्यातील "तू " आणि मग बघ दरवळू लागेल तुझा परिघही तुझ्या सुगंधाने.... तुझा सर्वात आवडणारा सण आलाय. लक्ष लक्ष दिव्यांचा साज लेवून. तुझ्या ओटीत त्या दिव्यांचे तेज घालायला. निघ परिघाबाहेर... एक श्वास घे मोकळा.... तुझ्या हृदयात तेवणाऱ्या त्या दीपाला आश्वस्त कर. एक उ:श्वास घे तुझ्या “मी” पणाचा. कर्तृत्वाची जाणीव होऊ दे तुझ्या मनाला. आणि बघ जबाबदारी आणि कर्तृत्वाच्या समन्वयाने कसे दिपून जाईल सारे विश्व ... आता अजून फक्त एव्हढेच म्हणेन ...  
“तुजपंख दिले देवाने .... कर विहार सामर्थ्याने...”

No comments:

Post a Comment