मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Sunday, November 30, 2014

धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म असतो

धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म  असतो,
तुमचा  आणि आमचा  अगदी ‘सेम’ असतो  !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात?
धर्माच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा,
धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म  असतो,
तुमचा  आणि आमचा  अगदी ‘सेम’ असतो  !
आपण हिंदू म्हणून जपत असतो
उर्दु  मुस्लिम म्हणून पाळत असतो;
इंग्रज ख्रिश्चन म्हणून दाखवत असतो
इतिहास माहित नसला तरी धर्म धर्म करायचं असतं
कोन्वेंटमधे शिकलात तरी धर्मावरचं प्रेम दाखवायचं असतं  !
जन्माला आलं कि शिक्कामोर्तब होवून जातं ,
जळीस्थळी सतत मग बिल्ला लावून फिरायचं असतं
आठवतं ना ? तुमचे , आमचे बारसे जेव्हा झाले होते.
गोविंद घ्या गोपाळ घ्या ने घर सारे दुमदुमले होते !
व्रतबंधनाच्या जानव्याने गायत्री मंत्राला जपले होते
संकटातून नेहमीच या अथर्वशीर्षाने वाचविले होते  !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
धर्मानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण, धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म  असतो,
तुमचा  आणि आमचा  अगदी ‘सेम’ असतो  !
धर्मबिर्म झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात,
धर्म म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
आम्ही कधी कुठल्याच देवळात गेलो नाही;
पन्नाशी उलटली तरी धर्म धर्म  केलं नाही !
आमचं काही नडलं का?
धर्माशिवाय अडलं का?
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म  असतो,
तुमचा  आणि आमचा  अगदी ‘सेम’ नसतो  !
त्याच्यासोबत कधी तुम्ही एकटेच बसले असाल,
वर बघून त्याच्याजवळ मनातल्या मनात रडला असाल !
तूच काय तो निर्णय घे म्हणून कधीतरी विनवत असाल,
 आर्त स्वरात त्याच्या कडे काहीतरी सांगत असाल !

धर्म म्हणजे दान असतं, तुझ्या माझ्या कुशीतल एक भान असतं ,
माणुसकीच्या नात्याचं खरखुरं सपान असतं !
फक्त दोन शब्दांनी व्यापलेलं विश्व असतं ,
चिरंतन सोबत देणारं एक धीरोदत्त गाव असतं !
धर्म म्हणजे धर्म म्हणजे धर्म  असतो,
तुमचा  आणि आमचा  अगदी ‘सेम’ असतो  !

Tuesday, November 25, 2014

नाती - गोती


आयुष्याच्या सुंदरशा टप्प्यावर
फुलत असतं जीवन
मी आपली एक जुना एक नवा धागा घेवुन
विणत असते नाती ...
न लादलेली..
एकत्रच वाढलेली..
एकाच बुंध्यातून निघालेली....
फांद्या होतात हळू हळू वेगळ्या...
वेगळी पाने वेगळी फुले वेगळी फळे
मग संबंध उरतो फ़क्त त्या बुंध्याशी
प्रत्येक फांदी स्वतंत्र ....
नाळ बुंध्याशी घट्ट रोवलेली....
बुंध्याचा रुबाब वाढविणारी...
फांद्याना जपायचे असते स्वातंत्र्य
एकमेकांत न अडकता फुलवायचे विश्व
सर्व वेदना संवेदना पोटात घालून
बुंधा पेलत असतो प्रत्येक फांदीचे असित्व...
गुमान.......
इथं मग उगीच नाते संबंध
तोच नात्यांचा भागाकार गुणाकारबेरीज नि वजाबाकी...
प्रत्येक नातं अधिक होत जातं
गुणाकार केल्यासारखं
आणि मग तेच नातं उणे होतं
काहीच शिल्लक न ठेवलेल्या भागाकारासारखं
जिथे ही वजाबाकी भागाकार नसतो
तिथे नात्यांची किंमत....
'क्ष'असते
जोड़तोड़ केलेल्या नात्यात
बरोबरची खुण असते
जर तर च्या आधारावर
गणिते जातात मांडली
समीकरणाच्या नियमात
अडकवली जातात नाती
मानलेल्या नात्यांची होते एकदा उजळणी
नियमबाह्य नात्यांच्या नशीबी हेटाळणी !!
- विशाखासमीर 

Monday, November 24, 2014

चिलकुर बालाजी - Chilkur हैद्राबाद

काही काही देवळात किंवा त्या देवळाच्या परिसरात नुसतं गेलं ना कि एक जाणीव होते. त्या देवाचे वास्तव्य तिथे असल्याची. आणि जमिनीवर पाय ठेवताच मनंच काय सारे शरीर हुरळून जाते. त्या जागेवर कधीकाळी असणारा देवाचा वावर आपल्याला आजही जाणवतो आणि मन प्रसन्नतेच्या पलीकडली क्षितीज गाठतं. असा अनुभव सर्वात पहिले जाणवला तो हिमालयाच्या कुशीत. तिथे सतत शंकराचे अधिष्ठान असल्याची जाणीव होते, नंतर द्वारकेत.... कान्हाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात ... शिर्डीत सतत साईंचा भास होतो ...सहज जरी रस्त्याने चालत असलो तरी जमिनीवर पाय थांबत नाही. अशीच अजून एक अनुभूती जाणवते ती चिलकूरला.
हैद्राबादला आल्यापासून कितीवेळा चिलकूरला गेलो आठवत नाही. नेहमीच जाणे असते. पण प्रत्येक वेळा श्री बालाजीचे अस्तित्व जे मला तिरुपतीला जाणवले नाही ते इथे जाणवते. 
चिलकूर ..... हैद्राबादहून २० किलोमीटरवर असलेले श्री बालाजीचे श्रद्धास्थान.
जाणकार या श्रद्धास्थानाचा इतिहास सांगतात कि येथे एक शेतकरी होता. तो नेहमी श्री बालाजींच्या दर्शनाला तिरुपतीला जात असे. पण तब्येत बिघडल्याने एक वर्ष तो काही तिरुपतीला जावू शकला नाही. त्याला खूप वाईट वाटत होते. एक दिवस श्री बालाजी त्याच्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी सांगितले कि तू वाईट वाटून घेवू नकोस मी इथेच तुझ्या जवळच्या जंगलात आहे. आणि मग त्याच दिशेने हा भक्त गेला, सांगितलेल्या जागेवर खणू लागला. त्याच्या कुऱ्हाडीला "टन" असा आवाज जाणवला, म्हणून त्याने बघितले तर तिथे श्री बालाजींची  मूर्ती होती आणि याच्या कुऱ्हाडीने मार लागल्याने त्यातून रक्तस्त्राव होवू लागला होता. "दुधाचा अभिषेक कर" असा हवेतून आवाज ऐकू आल्याने त्याने तसे केले. रक्तस्त्राव थांबला. श्री बालाजीच्या मूर्तीसोबत अजून दोन मुर्त्या उत्खलनात सापडल्यात. एक देवी श्रीदेवी आणि एक भूदेवी. या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच हे श्री चिलकूर बालाजीचे मंदिर.
या मंदिराचे एक वैशिष्ट्य ... इथे मूर्तीकडे डोळे मिटून बघायचे नाही. डोळे उघडे ठेवून देहभान विसरून लीन व्हायचे. भारतातील फक्त दोन मंदिरांपैकी हे एक मंदिर जिथे "First come First Service" इथे कुठल्याही प्रकारची दानपेटी नाही. एकही पुजारी तुमच्याकडून दक्षिणा किंवा दान घेत नाही. फक्त तुम्ही आजारी किंवा म्हातारे असाल तर तुम्हाला तेथील स्वयंसेवक डायरेक्ट मूर्तीजवळ घेवून जातील. आणि स्वयंसेवक कोण तर येथे येणारेच भक्त. ज्याला जसा वेळ असेल तसा तो सेवा देतो ... नि:स्वार्थ भाव आपल्याला इथे बघायला मिळतो. 
या श्रीबालाजीचे अजून एक नाव आहे.... "व्हीसा बालाजी" !! या बालाजीला पहिल्या भेटीत ११ प्रदक्षिणा घालायच्या नंतरच्या भेटीत १०८ मग तुम्हाला हवा तो व्हीसा मिळालाच म्हणून समजा...  अशी येथील समजूत आहे. त्यामुळे मंदिराच्या विस्तृत परिसरात शेकडो मुलेमुली, आबालवृद्ध तुम्हाला प्रदक्षिणा घालतांना दिसतात. धावपळ करत या प्रदक्षिणा सुरु असतात अगदी पहाटे ३-४ वाजल्यापासून !! तरी मंदिराच्या भिंतीवर मोठ्ठ्या अक्षरात पाटी लिहिली आहे "Don't count on numbers... Concentrate on God"
दर्शन घेवून बाहेर यायचं.... खंडीभर रानमेव्याची दुकानं. मस्त रानमेवा घ्यायचा आणि तो चघळत चघळत तेथून प्रस्थान करायचं..... "गोविंदा गोविंदा... गो....विंदा" 


वैशाख

"रम्य ते बालपण" आपण नेहमीच असे म्हणतो. आणि मग हे वाक्य येताच तो भूतकाळ एखाद्या चित्रफितीसारखा आपल्या डोळ्यासमोरून सरकू लागतो आणि आपणही गालातल्या गालात हसत हसत चक्क मांडी ठोकून त्या बाल्यात जावून बसतो. कोणी आपल्याला रागावलं .... कि तेव्हा येणारा तो राग... आणि फुगलेले गाल कसे शांत करायचे हे काकू, आज्जी, आईला चांगलेच माहिती असायचे... रागावला न तो तुला... थांब त्याचे घर ना आपण उन्हात बांधू.. आणि मग रडक्या स्वरात त्याच वाक्याला कडकडून मिठी मारणारे आपले वाक्य.."बिना छपराचे !!" आणि मग पळून गेलेला राग आणि  आईच्या कुशीत शिरून खाल्लेला आंब्याचा रस आणि पोळी. 
तेव्हा कित्ती भीती वाटायची त्या बिना छपराच्या घराची.. कित्ती विचार होता ना... भर उन्हाळ्यात कोणी कसे काय राहू शकेल असल्या घरात... होरपळून निघेल ..... 
आता त्याच वाक्याची मजा वाटते... राहायला छप्पर तर आहे. तरीही कुठल्या वणव्याने होरपळतोय इथे प्रत्येक जण ??? न सहन होणाऱ्या उन्हाळ्यापासून वाचायला आपण घरातच राहतो... मग कुठल्या उन्हाची झळ आजही सतावतेय आपल्याला?? 
लहान असल्यापासून अगदी उन्हाची पर्वा न करता रात्रीपर्यंत खेळायचं आणि रात्र झाल्यावर गुडूप. मग कुलर असो वा नसो... आता तर दिवस रात्र ए सी !! तरीही का लागत नाही शांत झोप??
या सर्व प्रश्नाची उत्तरे सापडलीत तरी आपण निरुत्तरित असल्यासारखे जीवन पुढे ढकलतो. आणि मग त्या वैशाखाची विविधता शोधण्यापेक्षा त्याच्या वणव्यालाच कवटाळून बसतो.    
खरे तर हा वैशाख... वैविध्याने नटलेला, सुगंधित फुलांनी सजलेला, भगवान विष्णूचा सर्वात प्रिय महिना... वैशाख म्हटला कि त्याबरोबर वणवा हा आलाच.... मग हा वणवा तडपत्या उन्हाचा असो, मुलांच्या सुट्टीतील धुमाकुळाचा असो, प्रवासाचा असो, आंब्याचा असो, मदर्स डे चा असो, उन्हाळ्यामुळे बिघडणाऱ्या तब्येतीच्या काळजीचा असो,  ... सर्वच कसे आनंदाने हिरवळून निघणारे...  सृष्टीच्या या अभूतपूर्व छटेला दणदणीत सलाम !!

बाळूकाका

घरातील मोठ्या लोकांना आधारवड म्हणतात.... त्यांच्याच  सावलीत आपली जडण घडण झाली असते म्हणून असेल कदाचित.. घरातील नात्यांची सुरवात कधी होते ??? अजूनही न उमगलेला प्रश्न. जन्मापासून काकांची मी लाडकी असे घरचे सर्व म्हणतात. पण मला काका समजायला लागले तेव्हापासून ते माझ्या जीवनातील अविभाज्य घटक. लहानपणी काका हवेत ...का ??? तर लहान असल्याने कोणीच  खेळायला घेत नाहीत आणि त्याचवेळी मला वाईट वाटू नये म्हणून बाहेर घेवून जाणारे...  मला एकटीलाच चॉकलेट देणारे काका.... भांडता यायला लागल्यावर चूक असली तरी माझीच बाजू उचलून धरणारे काका, मी कारसेवेला अयोध्येला जाते म्हटल्यावर लगेच माझ्यासोबत येणारे काका, माझे साक्षगंध झाले तेव्हा काका संघाचे विस्तारक होते. काही कामानिमित्य नाही येवू शकले... एक सुंदरसा शेला देवून म्हणालेत हा शेला राहील न..... संघ म्हणजे काकांचा प्राण ... आणिबाणीत नौकरी गेली तेव्हा घरातील एकमेव कर्ते - कमावते. पण कधी असल्या दुय्यम गोष्टी त्यांना हलवू शकल्या नाहीत. नसानसात भिनलेला प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान. कधीही कोणी आपल्या शब्दाने दुखविल्या जाणार नाही याची घेतलेली खबरदारी.... जीवनातील प्रत्येक क्षणाचे आनंदाने स्वागत करणारे अविचल व्यक्तिमत्व.  
दु:ख accept केले कि वाईट वाटत नाही असे म्हणतात. मग हे दु:ख नाही कि मी त्याला accept केलेले नाही अजून..... काहीच कळत नाहीये....हे दु:ख होणार हे माहित होतं. आज नाहीतर उद्या या प्रसंगाला सामोरे जावेच लागणार ही तयारीही असेल कदाचित मनाची. पण एकदम असं हे कोसळल्यावर मन का खचलंय ?? कशात म्हणजे कशातच मन रमत नाहीये. शो मस्ट गो ऑन ... असं दहा वेळा बजावून झालंय.... तरी अनामिक हुरहूर, धडधड ..... काकाचं असण - नसण एखाद्या अदृश्य लहरींतून जिवंत होणाऱ्या आठवणी....

"हि" ची गोष्ट


"हि" ची गोष्ट 
आज दुपारी सारे सिनेमाला जातील.... तुझी आई, दादा, आणि लहान बहिण. माझा लहान भाऊ आणि वहिनी. तू राहशील घरी माझ्यासोबत ?? १२वीत ४-५ वेळा नापास झालेला दत्ताकाका या चिमुरडीला बोलला. ही पटकन “हो” म्हणाली. आवडायचा हिला त्याचा स्पर्श. हिचा फ्रॉक काढून सर्वांगावर फिरणारे त्याचे ओठ... करकचून हिला कुरवाळणे. हिच्या अंगावरून फिरणारं त्याचं शरीर... त्याच्या अंगावर हिचं हुंदडणं सारं सारं तिला या वयातही हुरळवून टाकायचं.
आईनं कुठल्या वयात सांगायचं असतं आपल्या छकुलीला हे सारं?? लैंगिक शिक्षण – लैंगिक शिक्षण म्हणतात ते कधीपासून द्यायचं ?? “अ” “आ” “ई” शिकवायच्या आधीच ?? कि लेक गर्भात असतांनाच हे पाठ घ्यायचे असतात ??
इयत्ता पहिली ते तिसरी अशी तीन वर्षे हा दत्ता असाच खेळत होता तिच्याशी... आणि तिलाही खेळवत होता...
घरी आई, आज्जी.... पण कुणालाही कसलीही भनक नाही. या सर्व प्रकारात पकडले गेलो किंवा नाही गेलो तरी हिचे काय होईल ??? हिलाही कल्पना नाही. आता हि काही अगदीच लहान राहिली
नव्हती. मैत्रिणींच्या गप्पा ऐकून प्रेमा – बिमाबद्दल हिला कळू लागले होते. ५-६ वीत सर्वांनाच कळते तसेच.. तरीही तिच्या आणि बाळूच्या प्रकरणाला प्रेमाचे वैगरे नाव नाही द्यावेसे वाटले तिला कधीच.. पण हे काहीतरी “वाईट” आहे हि भावना हळू हळू तिच्या मनात घर करू लागली.... आणि ती बाळूला टाळू लागली... तरी तो कुठूनसा स्पर्श करायचा आणि हि झोकून द्यायची.. मधेच खुट्ट झाले कि भेदरायची.
ही सातवीत आली ...वडिलांची पुन्हा बदली.. नवीन गाव... मोठ्ठ शहर..इथे कोणीच कुणाला ओळखत नाही. कुणीच कुणाच्या अधे मध्ये नाही. कुणीच कुणाला कोपऱ्यात खिचत नाही किंवा पलंगावर झोपवून दाराची कडी लावत नाही. हिला हे मनोमन आवडले..... फार छान वाटले.. त्या आवडणाऱ्या स्पर्शापेक्षाही छान.... एक मोकळा श्वास घेवू शकतोय या समाधानाने ती बागडू लागली.. फुलू लागली... बुद्धीने, सौंदर्याने, व्यक्तिमत्वाने.....  हिने आता मनाशी एक खुणगाठ बांधली. मागचं सारं विसरायचं. पण त्या चित्र विचित्र आठवणी पिच्छा सोडेनात. सकाळी हि पेपर वाचत
बसलेली... अचानक लक्ष एका बातमीवर..... कोर्टाचा निर्णय... “अठरा वर्षाखालील मुलीवर तिच्या इच्छेने जरी शाररीक संबंध प्रस्थापित केलेत तरी तो बलात्कार असतो.”
ब – ला – त्का – र......नुसत्या शब्दांनीच हि हादरली. ... म्हणजे...म्हणजे.... आजपर्यंत मी ज्या गोष्टीला माझा गुन्हा मानत होती इतकी वर्षे ज्या ओझ्याखाली जगत होती.... तो गुन्हा किंवा फसवणूक नव्हतीच... तर तो होता बलात्कार... सतत सहा वर्षे माझ्यावर बलात्कार होत होता... डोके गरगरायला लागले.... हिने दोन हातात ते गच्च धरले... मान गुढघ्यात घातली आणि हिच्या मनाने आक्रोश केला.... अजून कोण कोण आणि किती चिमुकल्या असतील माझ्यासारख्या... ज्यांच्यावर वर्षानुवर्षे असले बलात्कार होत असतील... कसे थांबवणार आपण हे सर्व ??? शिक्षण, कायदे, कि संस्कार????


Sunday, November 23, 2014

नाती

आयुष्याच्या सुंदरशा टप्प्यावर
फुलत असतं जीवन  
मी आपली एक जुना एक नवा धागा घेवुन
विणत असते नाती ...
न लादलेली..
एकत्रच वाढलेली..
एकाच बुंध्यातून निघालेली....
फांद्या होतात हळू हळू वेगळ्या...
वेगळी पाने वेगळी फुले वेगळी फळे
मग संबंध उरतो फ़क्त त्या बुंध्याशी     
प्रत्येक फांदी स्वतंत्र ....    
नाळ बुंध्याशी घट्ट रोवलेली....
बुंध्याचा रुबाब वाढविणारी...
फांद्याना जपायचे असते स्वातंत्र्य
एकमेकांत न अडकता फुलवायचे विश्व
सर्व वेदना संवेदना पोटात घालून
बुंधा पेलत असतो प्रत्येक फांदीचे असित्व...
गुमान.......
इथं मग उगीच नाते संबंध
तोच नात्यांचा भागाकार , गुणाकार, बेरीज नि वजाबाकी...
प्रत्येक नातं अधिक होत जातं
गुणाकार केल्यासारखं
आणि मग तेच नातं उणे होतं
काहीच शिल्लक न ठेवलेल्या भागाकारासारखं
जिथे ही वजाबाकी भागाकार नसतो   
तिथे नात्यांची किंमत....
'क्ष'असते      
जोड़तोड़ केलेल्या नात्यात
बरोबरची खुण असते
जर तर च्या आधारावर
गणिते जातात मांडली
समीकरणाच्या नियमात
अडकवली जातात नाती  
मानलेल्या नात्यांची होते एकदा उजळणी
नियमबाह्य नात्यांच्या नशीबी हेटाळणी


- विशाखा समीर मशानकर

Friday, November 21, 2014

माझ्या नावाची ऐसी कि तैसी

माझ्या नावाची ऐसी कि तैसी......
"
विशाखा रामचंद्र देशपांडे" असे सोप्पे नाव घेवून 20 वर्षे वावरल्यावर आता दुसरे नाव लागणार. ... आम मुलींप्रमाणे.... 
आमच्या ग्रुपमध्ये लग्न जमण्यात पहिला नंबर माझा असल्याने पहिले तर कोणालाच सुचेना काय बोलावे ते !! मलाहि का कोण जाणे उगीचच कंपूतून बाहेर काढल्याचा भास झाला. .. तेवढ्यात एकाने शांतता मोडली आणि पहिलाच प्रश्न "ए, तुझे आडनाव नेमके काय?? म्हशाणकर, मशालकर, स्मशानकर..... आणि मग प्रत्येक जण हवा तसा उच्चार करू लागले. मलाही काहीच समजेना काय उत्तर द्यावे ते !! कारण इतक्या लवकर लग्न करायचे नाही या रेट्यात नेमके आडनाव विचारायचे राहूनच गेले होते.... आता तर या टग्यांना कोलीतच हाती लागंल. तेवढ्यात आठवलं माझा होणारा नवरा संगीताचा चुलत मामेभाऊ... "ए बाई सांगून टाक ना नेमके काय आडनाव आहे ते !!" आणि मग सर्वांनी मिळून माझे पाठांतर घेतले.
"
विशाखा समीर मशानकर" ... या नावाने मिरवणे सुरू झाले.
नावाची खरी खिरापत हैदराबादला झाली आणि अजूनही होतेय. सर्वात मोठी मजा म्हणजे "विशाखा"चा एकच अर्थ "विशाखापट्टन" म्हणजे Pure Telugu त्यात हे आडनाव. .. कोणी बरोबर वाचतच नाही मग मशानकर चे महाशंकर अगदीच अलगद होते. समोरची व्यक्ती गृहित धरून सरळ सुरू होते "बाऊन्नारा Madom??"
कितीतरी वेळा सांगितलं. . Visaka, Vishaka, Visakha असे काहीही नूसन Vishakha Mashankar आहे. मग हिंदी पेपर मधे नाव येतं विशाखा माशंकर...
एखाद्या कार्यक्रमात गेलं कि कोणीतरी परिचय वाचतं आणि तावातावात "Let me present before you... today's Guest.. Visaka Maha sankar..." हसावं कि रडावं ..

श्रीरामची आई ......

.. आणि बघता बघता प्रतीशचा मित्र श्रीराम रडू लागला.. काय झाले काहीच कळेना.. मग त्याच्या जवळ जावून पाठीवरून हात फिरवून विचारले,
" बाळा, काय झाले ?" 
न रहावून त्याचा बांध अचानक फुटला.. 
"आई, याची आई १:३० वाजताच बाहेर गेलीय इलेक्ट्रिक बिल भरायला... अजून नाही आलीय म्हणून हा रडतोय" 
"ऑन्टी, देखो न.....अब शाम के ६ बजे है..... सब ऑफिसेस बंद हो गये होंगे..... मेरी मम्मी को कुछ हुआ तो नही होगा न ???".... 
लेकरू हमसून हमसून रडत होत. 
घराला कुलूप....आत्ता बिल भरून येते मुलाला मित्रांशी खेळ म्हणून गेलेली आई... ५ तास झालेत तरी आली नाही. मनातून तर आम्हालाही खूप भीती वाटायला लागली. पण त्याच्या समोर कसे काय बोलणार ?? त्याला समजावणे सुरु झाले..... आई कधीच बाहेर जातांना फोन नेत नाही.. वडिलांनी नुकताच नंबर बदलविल्याने त्यांचा नंबर माहित नाही..... आम्हाला शिफ्ट होवून जेमतेम महिना झालेला.. जास्त ओळख नाही... मुलं पटकन मिसळतात.... आमच्या घरी कसलेही बंधन नाही त्यामुळे सतत आजूबाजूच्या मुलांचा धिंगाणा....आम्हाला कळतं आजूबाजूला कुठली बिऱ्हाड आहेत ते !! 
पण आज या मुलाला कुशीत शिरून रडतांना बघितल आणि जीवाची तगमग अजून वाढली .... त्याला शांत केल आणि हातात एक फोन दिला.... ज्यांचे कुणाचे फोन नंबर माहित असतील त्यांचे नंबर फिरव.... मग त्याच्या लक्षात आल कि त्याला आजीचा नंबर माहित होता!! आजीला फोन झाला...आजीलाही वडिलांचा नवीन नंबर माहित नाही.... मग मावशीला फोन झाला... खूप रडणे झाले...मावशीने वडिलांचा नंबर दिला... 
वडिलांचे ऑफिस अमिरपेठला...तिकडून घरी यायचे म्हणजे अजून एक तास !! याचे मागच्या एक तासापासून रडणे सुरु... रात्रीचे आठ वाजलेत...वडील घरी आलेत...त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून सर्व मुले खाली उतरलीत....आणि आनंदाने सर्व मुले उडत उडत घरी आलीत.......
श्रीरामची आई आली ... श्रीरामची आई आली.... आनंदाने आमच्या डोळ्यातूनही पाणी..... मागोमाग श्रीराम आला... मला म्हणाला,"मालूम है ऑन्टी मुझे रुलाके मेरी मम्मी कहा गयी थी???? 
Beauty Parlour !!

१५ ऑगस्ट २०१२

14 - 15 ऑगस्ट 2012 आणि चंचलगुडा जेल...
सकाळ पासून वेध... अस्पष्ट दृष्टिपथ.. आजपर्यंत जेल फ़क्त सिनेमातच बघितली प्रत्यक्षात नाही...बाकी बायकांसारखा असा काही माझा अनुभव नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी नागपुरची कारसेवक म्हणून चांगला 10 दिवसांचा उत्तर प्रदेश सरकारचा पाहुणचार नैनीत घेतला होता.... 
पण आजची जेलवारी काही वेगळी होती. कारागृहातिल महिलांकरता कार्यक्रम.
"Mam, you have to come as a chief guest" आग्रहाचे बोलावणे..  खरे तर अशा ठिकाणी जायला मला आग्रह मुळीच लागत नाही.. उलट लाळ टपकवत मी ओर्गनायज़रर्सच्या आधीच पोचलेली असते. इथेही तसेच झाले. एखाद्या समारंभाला आल्यासारख्या सर्व मारवाडीणी एक तास उशीरा उगवल्या. आणि कार्यक्रमाआधी काही थ्रिलिंग मिळतं का म्हणून मी एक तास लवकर..  मोबाईल, कैमरा, पर्स सारे काही सेक्युरिटीच्या स्वाधीन करून मला जेलरच्या रूममधे बसविले. जेलर खाली कार्यक्रमाच्या तयारीत... चौतर्फा लटकणारे फोटो आणि मधे मी... रिमांडवर असल्याचा भास.  सफोकेशन !!
तब्बल दोन तास जेलरच्या प्रशस्त खोलीतील गुदमर सहन करून आम्ही खाली उतरलो. जेलर आणि वार्डनने गुलाबाच्या फुलाने केलेले स्वागत त्यानंतरचे ओळख - पाळखवाले सोपस्कार.. फॉर्मल कार्यक्रम उरकला भलामोठा स्टेज आणि समोर 50 फुटावर 200 महिला कैदी... आता स्टेज आमच्या स्वाधीन करून पोलिस तुकड़ी समोर खुर्च्यांवर जावून बसली.. देशभक्तिपर गीतांचा पावूस पडू लागला. काही वेळाने माईक माझ्या हाती आला.. 
जेलरला विनंती केली... त्यांच्यात जावून कार्यक्रम करू ?? 
ती म्हणाली .. ते कैदी आहेत .. सोल्जर्स नाहित.. 
काय हरकत आहे?? या माईकशिवाय माझ्या हातात काहीच नाही...
रिस्क आहे..
आवडेल मला..
ठीक आहे... 
तिच्या या दोन शब्दावर स्टेजवरुन उडीच मारली.. सुरवातीला त्या बायका थोडया अनकम्फर्ट होत्या.... थोड्याच वेळात सर्वांनी धुमाकुळ घातला...नंतर खंडीभर गप्पा... त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे शॉपिंग... नाश्ता... Heaven..  2-3 तास का होईना सर्वांना स्वतंत्र झाल्यासारखे वाटले.. स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या न मागितलेले दान ओटित घालून विसावली.... 
'दुसर्या दिवशीपण या' असा आग्रह.. गेल्या गेल्याच ascorting ला जेलर वार्डन ची जोडगोळी. सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून कारागृहाचे ध्वजारोहण झाले... पंतप्रधान झाल्याचा फील...  त्याआधी आणि नंतर बरेच झेंडे फडकविले... पण 2012 चा 15 ऑगस्ट .. हातातून उरात साठलाय...
फीलिंग.. जन्मोजन्मीचे पूण्य.


नामसंकीर्तन

नामसंकीर्तन 
तुझ्या जाणीवांची कमतरता भासते अन पळते मी सुसाट ...... तुला शोधत ... कधी आजुबाजुला कधी सावलीत कधी मनात... कधी आठवणीत..... तू तर म्हणाला होतास की तू माझ्या आजुबाजुलाच असतोस ... मग का नाही जाणवत मला तुझं असणं?? प्रत्येक श्वास वेचते मी आजकाल.... ते सुद्धा भरकटलेले असतात. ओंजळीत पडल्याचे नाटक करतात नि डोळ्यातून वाहतात...
मनाची गुंतागुंत आणि निस्तेजता....
नकळत अशाच वेळी 'ओंकार' कानात घुमावा.. थेट हृदयातून सारया अंगभर फिरावा.. डोळ्यांनी आणि मनाने तो क्षण अन क्षण टिपावा. रक्तासोबत वाहणारा तो ओंकार अनुभवावा. थेंबाथेंबातून मग एकच भावना ओसंडावी....
"विश्वाचे आर्त माझ्या मनी विसावले..."  
स्वप्न - जाणीवा - दृष्टांत एकरूप व्हावेत.. डोळ्यांनी जाणवावे अन मनाने बघावे. नादब्रह्म !! नामसंकिर्तनाचे अभ्यंगस्नान !!
बिंदुचा सिंधु करून दाखविणारया त्या परमेश्वराच्या परमोच्च दर्शनाची अनुभूती घ्यावी. अन भक्तीरूपी निश्चल, निर्मळ गंगेला रोमारोमात सामावून घ्यावे...   
संत मीराबाईचे बोल ओठावर यावेत...
जनम जनम कि पूँजी पाई
जगमै सबै खोबायो ||
खरचे नै कोई चोर न लेवै
दिन दिन बढ़त सबायो
पायोजी मैंने राम - रतन धन पायो ||

Thursday, November 20, 2014

बडे मिया दिवाने ऐसे न बनो

बडे मिया दिवाने ऐसे न बनो
हसीना क्या चाहे हमसे सुनो
लहानपणापासून कानावर आदळणारी हि आणि अशा सारखी गाणी नेहमीच मुलगी, महिला म्हणून आपल्या अस्तित्वाला कात्री लावणारीच वाटतात. खरंच आपल्याला काय हवंय किंवा नकोय हे कसं कळेल या लोकांना ?? आपल्या बद्दल जे बोलले जाते ती खरंच आपली आवड कि आपल्यावर लादलेली ती देखील.... जशा रूढी परंपरा या मोठ्या मोठ्या नावांखाली महिलांचे अस्तित्व दाबून टाकले जाते तसे ते अजूनही असल्या गाण्यांनी चिरडल्यासारखे वाटते. "मी एक स्त्री" म्हणून माझी ओळख काय ??? हे मी ठरवायचे कि माझ्यावर संस्कारांचे बीज म्हणून मी कशी असावी याचे नियम आजूबाजूच्यांनी करायचे... खरेच संस्कारी स्त्री म्हणजे कोण ??? अत्याचार सहन करणारी.... "अरे" ला "का रे" ने उत्तर न देणारी... मूकपणे होणारी मुस्कटदाबी सहन करणारी... हीच का संस्कारी आणि सहनशील आदर्श महिला ???
हीच जर आदर्श महिला असेल तर व्यर्थ ती जिजाऊमाता.... जिने प्राणप्रतिष्ठा करून शिवबा घडवला... व्यर्थ त्या झाशीच्या राणीचे बलिदान.... व्यर्थ ती अहिल्याबाई होळकर..... व्यर्थ सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आणि अनेक अशा माता भगिनी ज्यांनी प्रवाहा विरुद्ध जावून एक नवीन इतिहास घडवला...
हो मान्य आहे आजच्या स्त्रीला स्वातंत्र्य दिले जाते. पुरुषांच्या बरोबरीने वागविण्याचे निदान नाटक तरी केले जाते. अगदी उच्च पदस्थ स्त्रीचा सन्मानही केला जातो वेळच्यावेळी !! पण खरेच काम करतांना तिला स्वातंत्र्य दिले जाते ?? कधी बदलणार हि धारणा ??? बाईला "बाई"सारखे जगतांना होणाऱ्या यातनांची होईल कधी घटना तयार ??? घटनेने बदलेल साऱ्या जगाची मानसिकता??? अजूनही २१व्या शतकात हि सारी प्रश्ने अनुत्तरीतच !!
स्त्री मुक्ती म्हणजे काय ???
खूप दिवसांपासून मला एक प्रश्न पडतो.....  काही बायका "स्त्री मुक्ती.. स्त्री मुक्ती" म्हणून ओरडत असतात सारख्या... यांना नेमके काय हवे असते ??? म्हणजे पुरुषांना शिव्या देणे... कि त्यांची बरोबरी करणे ?? अरे ज्या निर्मात्यानेच पुरुष व बाईला वेगवेगळे निर्मिले आहे ते बरोबर कसे ?? वंशवृद्धी प्रत्येकाला हवीच असते मग ती बाई असो कि पुरुष.... आता मी असे म्हटले कि या खवळून उठणार .... कारण केजी तील मुलांसारखीच यांची अक्कल.... पण माझ्या दृष्टीकोनातून वंशवृद्धी म्हणजे कोणीही .... प्रत्येकाला एक अपत्य असणे मग ते मुलगा किंवा मुलगी कोणीही ... तर या अपत्य होण्याची एक प्रोसेस ... यात मग या मुक्तीवल्या स्त्रीयांना माझा एक प्रश्न... इथे दाखवा ना... समानता.... कशाला पुरुष हवाय वर चढ ??? समांतर होवून जावू द्या ..... 
माझ्या दृष्टीने बुरख्यातली ती बाईपण मुक्त आहे जी व्यसनी नवऱ्याला सोडून एखाद्या Beauty Parlour मध्ये १० हजाराची नौकरी करतेय आणि आपल्या दोन मुलांना वाढवतेय. माझ्यामते ती कामवाली बाई देखील मुक्त आहे जी नवऱ्याच्या मुस्कटात मारून चार घरची धुणी भांडी करतेय आणि आपले कुटुंब पोसतेय. माझ्या मते त्या डोक्यावर पदर घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीही मुक्त आहेत ज्या ३ महिन्यातून एकदा पहाटे भाजी बाजारात जमतात.... तेथील नेत्यांशी, गुंडांशी भांडून बाल मजुरांना मुक्त करून आश्रमात पोचवतात... एक एक करून महिन्यातून एकदा त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी उचलतात. माझ्या मते तरी या सर्व गृहिणी मुक्त आहेत ज्या आपल्या मुलांना त्यांच्या पॉकेट मनीतील काही भाग विधवा पेन्शनला द्या असे संस्कार त्यांच्यावर करतात. नुसते मॉड कपडे घालून समुद्राच्या काठावर बसून स्त्रीमुक्तीच्या कविता वाचणाऱ्या थोतांड गप्पा मारणाऱ्या काय मुक्ती घडवून आणणार ???

लाडबझार - चारमिनार

लाडबझार - चारमिनार 

झुण झुणक झुणक झुण झुंना
झुण झुणक झुणक झुण झुंना
आट्टूश पान बाई आट्टूश
गोठ तोडे घालून आपण नट्टूश !!
इतिहासाच्या तिजोरीत बंद झालेलं हे गाणं “रमा – माधव” च्या निमित्त्याने पुन्हा उघडलं गेलं आणि सूर नव्याने जुळू लागलेत हातातल्या कांकणासोबत!! कांकणबांगड्याचुडी...  जिव्हाळा प्रसविणारा निर्जीव जीव. लहानपणी हातभर बांगड्या घालून नाचणारा आपला हात. प्रत्येकाला त्या दिसाव्याआपलं कौतुक व्हावं म्हणून सतत खळखळत मागण्या पूर्ण करून घेणारे बालपण कधी सरतं हे कळतं न कळतं तेच हिरव्या चुड्याच्या हिरव्यागार वयात मन ओथंबू लागतं.  
"छनन छन चुडिया खनक गयी देख साहिबा...
चुडिया खनक गयी हाथ मा.. मोरनी बागा मा बोले आज रातमा ..."
या गाण्याचा जौहार सुरु होतो. आणि कुठल्याशा अनामिक क्षणी परिकथेतिल राजकुमार अलगद हातात बांगड्या चढवत म्हणतो...
"
चूड़ी नही मेरा दिल है... देखो देखो टूटे ना.."
तारुण्यानं मुसमुसलेल्या मनाला सख्यांची कुजबुज जाणवू लागते...
"
किन किन काकणरूण झुण पैजण सजली नटली नवरी आली..
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली ग पोरी नवरी आली"
येथुनच सुरु होते हिरव्या - लाल चुड्याची खळखळ... नैसर्गिक नात्यांची गुंफण...
बोले चुड़िया बोले कंगना
हाय में हो गयी तेरी साजना...
.............
हाय!!! ये चुड़िया माफ करा या बांगड्या आमचा विक पॉइंट म्हणून ऐटीत किणकिणतो!!
या किणकिण हौसेला जर खरेच पूर्णत्व द्यायचे असेल तर हैदराबादच्या “चुडी बाजारात” एकदा याच. चारमिनारच्या कुशीत विसावलेल्या या बाजाराला ऐतिहासिक गंध. त्याच कुतुबशाही, निझामशाही गंधातून सजलेला चमचम बाजार. याचे अजून एक नाव “लाड बाजार”. लाड म्हणजेच लाख. इथल्या बांगड्यांचे विशिष्ट्य म्हणजे लाखेवर कोरीव कातीव नक्षीकाम. आकर्षक रंग, कृत्रिम खडे, कुंदन, मोती आणि मिनाकारी याचा सुंदर अविष्कार. हवा तो रंग, हवा तो साईज, हवी ती रंगसंगती !! जवळपास एक लाखाहून अधिक व्हेरायटीत दिमाखात चालणारा एक किलोमीटरचा विस्तार असलेला हा झगझगीत रस्ता... रस्ता?? म्हणजे माणसांखाली रस्ता कि रस्त्यावर माणसे हा प्रश्नच!! त्या रस्तातून डाव्या – उजव्या बाजूला १०-१० फुटांवर अनेक गल्ल्या. ९०% बांगड्याच!! बुरख्यांच्या गर्दीतून वाट काढीत घुसायचे , हो अक्षरश: घुसायचेच कारण जायचे हा शब्दप्रयोग निदान या भागास तरी लागू होत नाही. पहिल्यांदा गेल्यास क्षणभर “मिनी पाकिस्तान” मध्ये आल्याचाच भास होतो. चौफेर बुरखाधारी आणि क्रोशाची गोल टोपी घालणारी गर्दी!! देशी विदेशी पर्यटकांची तामझाम!! गेल्या गेल्या दुकानदार पर्यटक आणि स्थानिक लगेच हेरतो. नेहमीचे गिऱ्हाईक आणि पर्यटक यांत सुरक्षित अंतर राखले जाईल याची जबाबदारी घेतली जाते.
“हमेशा के है ना भैया, बराबर बोलो”
“समज में आये सो चुडी इतनी महेंगी ??” पहिले वाक्य नाही पण दुसरे त्याला खात्री देवून जाते गिऱ्हाईक हैद्रबादचाच!!
खरेदी करता करता मधेच घरून किंवा कोणा मराठी व्यक्तीचा फोन येतो आपण मराठीत बोलतो. बाजूला असणारे मराठी पर्यटक कान लावून ऐकतात. फोन संपल्या संपल्या पटकन विचारतात,
“हे घेतेय/घेतोय, इतका भाव म्हणतोय, बरोबर का??”
बाजार जरी बांगड्यांचा असला तरी मराठी माणूस येथे मोती/खडे खरीदतांनाच दिसतात. कदाचित त्या लाखेच्या बांगड्यावरील बटबटीट नक्षीकाम आणि त्याची घसघशीत किंमत आपल्याला थोडे विचारात टाकते. पण एकदा हैद्राबादच्या कल्चर मध्ये वावरले कि त्या बांगड्यावर आपोआप प्रेम जडते आणि ती किंमतहि ठीक वाटते. तशा या “चुडी बाजारात” अगदी १० रुपयांपासून ते १,००,००० पर्यंत वाईड रेंज आहे बांगड्याची !! आपल्या बांगड्यांच्या डब्ब्याला जरा या बांगड्याची जोड द्या... राजेशाही फील येईल!! हौसेला मोल नाही असे म्हणतात तेच खरे !!
चुडीया खनकी, खनकानेवाले आ गये... !!  



कातडी

कातडी...
 नविन लग्न !! अवघे दोन दिवस झालेले. चारी दिशांनी ओसंडणारे कोडकौतुक !!  चुलत सासूबाबाईंच्या भावाचे लग्न... पहिल्यांदाच खेड्यातील लग्नाचा अनुभव.. सकाळपासून पोटात काहीच नाही. नविन सून .... बोलायची उजागिरी नाहीच नाही. लग्न झाल्या झाल्या विहिणीच्या पंक्तीत बसायला मिळतंय तुला... भाग्यवान आहेस.. म्हणून कौतुक.. नवऱ्यामुलीपेक्षा सर्वांना हिच्यातच इंटरेस्ट. कारण नवरी गावातलीच - डॉक्टरची मुलगी..  फेमस. गावात भलतेच गाजलेले प्रेमप्रकरण. वधु जुनीच.... दोन दिवसांनी जरी सिनियर तरी गावातल्या लोकांना ही नवी.. त्यातल्या त्यात शहरातली.. सर्व गोतावळा हिच्याचभोवती...
विहिणीची पंगत सुरु झाली... ज्याला जशी येतील तशी गाणी रेकून झाली.. पोटात भुकेचा गोळा.. पहिला घास घेणार तेव्हढ्यात एका बाईने येवून हात पकडला... जेवायचं नाही... नाव घे आधी.. पुन्हा प्रश्न... लग्न तर दोन दिवसांपूर्वीच झाले... हे सारे सोपस्कार तेव्हाच उरकलेत... आता काय पुन्हा हे ?? घाबरतच प्रश्न टाकला.. पण कोणी ऐकेचना.. आम्ही नव्हतो ग लग्नात... कित्ती गर्दी होती विहिणीच्या पंक्तीत... आम्ही नाही ऐकला हो तुझा उखाणा ... घे पटकन.. ज्युनियर आहेस तू.. ऐकायचे... एक नणंद ओरडली... "आयला raging ??" कासवासारखा स्वभाव पाठीत घालून ही गप्प !! भूकेपोटी जुळवाजुळव करून दोन चार उखाण्यांनी उपस्थित बायकांचे पोट भरले.. आणि हिचे जेवण सुरु झाले...
पहिला घास... भाजी - पोळी... देव आठवले..घास घशात अडकला.. जोरात ठसका... भाजीत तिखट कि तिखटात भाजी ?? कोशिबिरीपासून सर्व जहाल.... डोळे लाललाल. काकुसासू बाजूलाच बसलेल्या.. त्यांना परिस्थिती जाणवली. जेवण(?) झाल्या झाल्या वऱ्हाडी खोलीत नेवून त्यांनी लाडू, चिवडा चकल्या दिल्या ... त्यातल्या त्यात चकल्या कमी तिखट... त्या लाडवासोबत गिळल्या.... अवस्था भयानक ... प्रश्नोत्तराचा तास संपता संपत नव्हता.. शेवटी हिची रवानगी काही मुलींसोबत वाड्यावर...  खुणेनेच हिने नवऱ्याला सोबत चल अशी विनवणी केली.... तर त्याच्यासोबत अजून ५-७ मुलेही आलीत... १५ -२० जणांचा घोळका वाड्यावर निघाला....
हिला जरा माणसात आल्यासारखे वाटले..  
वाड्यात  दोघांना पाळण्यावर बसविले.. आणि समोरचा वाघ दाखविला... ही क्षणभर स्तब्ध.. घाबरून नजर वळविली.. दुसरा वाघ.. एका बाजूला हरणांचा कळप...
"अजब बंगला??" ... नागपूरला आहे.. ही कधीच गेली नाही तिथे ....  जिवंत प्राण्यांपेक्षा अशा भुसा भरलेल्या प्राण्यांची जास्त भीती ..  तिथे खरे काहीच नसते... कातड्याशिवाय..
थोड्याच वेळात २-3 छोटी मुले वाड्यात धावत आली... 
"वरातीची वेळ झाली... पाण्याची, दुधा  - दह्याची घंगाळी तयार आहेत न ??"
या प्रश्नावर बरीच धावपळ सुरु झाली.. दिंडीदरवाजाशी तांब्याची लखलखीत ५-६ घंगाळी सजविण्यात आली.. आत चौकात लक्ष्मीपूजनाची तयारी करायला त्यांचे कुलगुरू आले..
घंगाळ्याकडे त्यांनी एक कटाक्ष टाकला.. अक्षतांचे ताट आणि काही पूजेचे सामान ठेवले..
कुणीतरी सजविलेले माप आणून चौकटीवर ठेवले...
"रंडीच्याSSSS...." गुरुजी ओरडले. माझी नजर नुसती भिरभिरत होती..
एक एका प्राण्यावर.. त्यांच्या कातडीवर ... मधून लोम्बून राहिलेल्या भूस्यावर..
ते माप दिंडी दरवाजावरून चौकातील दरवाजावर ठेवण्यात आले..
वरात आली....
भराभर सर्व बायकांना आत घेतले... माणसे दाराबाहेर.. छोटी छोटी मुले आधीच बाजूच्या वाड्यात पिटाळलेली...
नवरा - नवरीचा प्रवेश...
आणि कसलेसे वेदोच्चार... जोर जोरात मंत्र... देवतांना आवाहन... सर्व स्तब्ध !! भयाण शांतता...
आणि..... बघता बघता पाण्याचे घंगाळ नवरीवर उलटे झाले... ती जोरात किंचाळली... अनपेक्षित !! मंत्रोच्चराचा वेग वाढला.... आता दुध - दहि.. पुन्हा पाणी... पाच वेळा... ही घाबरली...  बाजूला कोण आहे हे सुद्धा कळत नव्हते.. अडखळत विचारले..
"हा काय प्रकार??"
"शुद्धीकरण.. इंटरकास्ट लग्न"
"काय????"
हिच्यातला कासव गळून पडला. डोळे विस्फारले गेले... आवाज जरा मोठा झाला...
"हे चुकीचे आहे..."
कुठूनतरी गर्दीतून सासूबाई आल्यात... तोपर्यंत एकीने हिचे तोंड दाबून ठेवले...
मागच्या दारातून रवानगी थेट शहरात... सोबत अंग चोरून बसलेला नवरा...
ही गच्च डोळे मिटून.. असंख्य प्रश्नांत गुदमरत...  कातडी पांघरलेले प्रश्न....
त्या जनावरांसारखा, त्या हिंस्त्र पशुंसारखा प्रत्येक माणूस कातडी पांघरलेला !!
लग्नाच्या आधीपासून तिचे वाड्यावर येणे जाणे होते... अगदी लहानपणापासून म्हणा न.. डॉक्टरची मुलगी म्हणून हिला आणि हिच्या बहिणींना विशेष मान. या मुली जे म्हणतील तेच खेळ खेळायचे. हि मधली असूनही हिचीच बॉसगिरी पूर्ण ग्रुपवर !! पदवी शिक्षणासाठी हि नागपूरला गेली... म्हणजे शहरातले शिक्षण. पण अभ्यासात मुळीच इंटरेस्ट नाही. एक ब्युटीशियनचा कोर्स करून हि गावात परतली. ब्युटी पार्लर सुरु केले. गावातील पहिली उद्योजिका म्हणून हिचे सत्कार झड़ू लागलेत. प्रतिष्ठित लोकांमधे हिची उठबस वाढली. शहरात जाणे - येणे वाढले... त्यातच विराटची आणि हि वरचेवर शहरात भेटू लागले.... वाड्यातील शेंडेफळ हिच्या प्रेमात पडले...
हिचे वडील डॉक्टर..... त्यामुळे वाड्यावरील दुखणे खुपणे त्यांना चांगलेच ठावूक... प्रत्येकाची नाडी त्या डॉक्टरच्याच हातात.. वाड्यावर indirectly डॉक्टरचा दबदबा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना जमिनदारीचे डोहाळे... आणि सर्व डोहाळे निस्तरणारा हा डॉक्टर... आज त्याची मुलगीच ह्या घरची सून झाली... सर्वात लहान सून !! वाड्यावरच्या एकुलत्या एका इंजिनियरशी हिचे लग्न बऱ्याच ताणतणावात पक्के झाले... भलेही याने ४ वर्षांचे इंजिनियरिंग १० वर्षात पूर्ण केलेले !!
........ वाड्याचा एक हिस्सा यांना दिला गेला. वाड्याचे पहिले पार्टीशन !!
त्यानंतर जवळपास २ वर्षांनी काकासासरे वारलेत म्हणून गावी आलो. भोवताल पुन्हा लग्नातला गोतावळा. यावेळेस आमच्या वाड्यावर !! या गोतावळ्यात एकच मॉडर्न आणि पॉश बाई.... बॉबकट, सिफोनची साडी, गळ्यात छोटेसे मंगळसुत्र, हातात एक एकच कडे. (तेव्हा सासरी जायचे म्हणजे गळ्यात मोठे मंगलसूत्र, एखादा लहान, एखादा मोठा दागिना, हातभर बांगड्या घालाव्या लागत.. सोबत पाटल्या तोडेहि) एकदम टकाटक बाई.. उंची -रुंदी सारे काही डोळ्यात भरणारे.... हि छोटीमामी... तू आली होतीस ना हिच्या लग्नात ?? मी flat ... अगदी ती मामी वाड्याबाहेर निघेपर्यंत तिच्याकडे एकटक बघत बसली..
तिची पाठ फिरल्याबरोबर बायकांच्या बोलण्याला ऊत आले. दोन वर्षात ह्या बयेने रंग दाखविले बघ. एक एक करून वाड्यातील सर्व महागडे सामान सोयीस्कर आपल्या घरात वळविले. आपल्याच शेतीने हिचे माहेरच काय तर, बहिणींची घरेही भरते. आम्हाला तर अजून पसाभर धान्य माहेरी न्यायची उजागिरी नाही. तातेजींवर काय जादू केली कुणास ठावूक. दर २-3 महिन्याकाठी तोळा तोळा सोने नेते. सर्वांसारखेच तिच्या अंगावरही दागिने घातलेत. पण ते सारे लॉकर मध्ये टाकून थुतूर - मुतूर दागिने घालून फिरत असते गावभर... महिन्याला नवा दागिना.. ना सासूचा मान ना नणंदा - जावांचा.. काय जादू केली पुरुषा - मुलांवर देव जाणे... दिवस रात्र सारे हिच्याच तालावर नाचतात.. संत्राची पहिली टोपली हिच्याकडे... इथे कधी आपल्या मुलांना सांभाळले नसेल पण तिकडे जावून तिच्या मुलाची लंगोटी - दुपटे बदलवतात.. तिला काही साधेपणाने म्हटले तरी गुर्रावते.. आणि तिचा आवाज वाढला कि सर्व तिच्याच बाजूने...  आम्ही दुर्लक्षित !!  
बायकांच्या या गोष्टीने हिला कन्फ्युज्ड केले...मामीला खूप सासुरवास वैगरे होत असेल अशी हिची कल्पना पार धुवून निघाली. पहिलेपासून कल्पना असली तरी मामीच्या डोळ्यासमोरून "शुद्धिकरण" बाजूला झाले नसेल कदाचित !!... आणि हि banded क्वीन झाली.... टेरर सुना, खाष्ट सासवा - नणंदा ह्यांना ही पुरून उरली.... नव्हे सर्वांची पळता भुई थोडी केली.. घर - घरपण घाऊक झाले... सर्व प्राण्यांचे कातडे चिरल्या गेले नि भुसा बाहेर आला.. 

- विशाखासमीर 

Sunday, November 16, 2014

किसरा - Keesargutta


कीसरगुट्टा ... हैद्राबादहून जवळपास ३० किलोमीटरवर हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं महादेवाचं जागृत देवस्थान. कुठल्याही मौसमात जा ... प्रसन्नच वाटत. भोवताल पसरलेला निसर्ग आणि देवाचं वास्तव्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या अनेक गोष्टी. मग अगदी प्रत्येक दगडातही आपण देव पाहू लागतो.
कथा  : रावणाचा वध करून येत असता प्रभू श्रीरामांना याच डोंगरांच्या सानिध्यात महादेवाला एक अभिषेक करायचा होता. त्यांनी हनुमानाला वाराणशीहून शिवलिंग आणावयास सांगितले. नेहमीप्रमाणे "हे घेवू का ते" या  संभ्रमी वृत्तीने हनुमानजींनी १०१ लिंगे आणलीत. परंतु असे करीत असतांना इकडे अभिषेकचा मुहूर्त टळून जात होता. म्हणून स्वत: श्री महादेव प्रकट झालेत आणि त्यांनीच प्रभू श्रीरामाला एक भले मोठे लिंग देवून त्याची पूजा करावयास सांगितली.
अभिषेक झाल्यावर हनुमानजी १०१ शिवलिंग घेवून प्रकटलेत ... त्यांना भयंकर राग आला...... आणि मग रागाच्या भरात त्यांनी सर्व लिंग त्या पहाडावर भिरकावून दिलीत..... आजही त्या ठिकाणी इतस्तत: पसरलेली शिवलिंग दिसतात... एका भल्या मोठ्या बजरंगबलीच्या मूर्तीसोबत !!
  आम्हा पूर्ण कुटुंबियांच आवडतं तीर्थक्षेत्र. मग मनात आलं तेव्हा गाडी काढायची आणि मनमुराद त्या निसर्गाच्या साम्राज्यात वसलेल्या असंख्य शिवलिंगां शी हितगुज करायचं !!

Keesaragutta Temple is a temple dedicated to Lord Siva and his consorts Bhavani and Sivadurga at Keesaragutta in Rangareddy district. It is about 40 km from Hyderabad and 10 Km from ECIL. It is located on a small hillock. The temple draws thousands of devotees on Shivaratri.
Legend has it that Sri Rama installed the Siva lingam here to atone for the sin of killing Ravana, a Brahman. He selected this beautiful valley surrounded by hills and verdant greenery for the purpose and ordered Hanuman to bring a Sivlingam from Varanasi. Hanuman was late in arriving with the Siva lingam and as the auspicious hour was nearing, Lord Siva himself appeared before Sri Rama and presented a Sivilingam for installation. Hence the lingam in the temple is called Swayambhu Linga. It is also called Ramalingeswara as lord Sri Rama had installed the lingam.
Hanuman returned with 101 lingams for selection from Varanasi and felt aggrieved at not having his lingam installed. Hence he threw them all over the area. Even to this day several lingams are found scattered all over the place outside the temple.
To mollify Hanuman, Sri Rama ordained that precedence would be given to him for worship at the temple. He also said that the hillock where the lingam was installed would bear his name kesarigiri i.e., Hanuman, the son of Kesari. Over a period of time, it has become corrupted and is now known as Keesara and the hill as Keesaragutta. Ever since, the rituals follow the command of Sri Rama.
भिर भिर पावसात काही औरच मजा !!






इतस्तत: आढळणारी शिवलिंग ...




स्त्री - मुक्ती

आरोहातील सप्तसुरात आपले जीवन न्हावून निघाले असते, तारुण्यातील वातावरणात धुंद असताना सूर्याची सप्तकिरणे नकळत आपल्याला आरोहातून अवरोहात म्हणजे माहेरहून अलगद सासरी आणतात. एका मंगलमय वातावरणात, अग्निदेवाच्या साक्षीने, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने रेशमी इंद्रधनुष्य साकारण्याचे बळ घेवून आपण एका नवीन विश्वात प्रवेशतो. माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी आल्यावर  "चूल आणि मुल" एव्हढेच आपले जीवन नसून  एक वेगळ अस्तित्व  असल्याने त्या दिशेने आपली वैचारिक वाटचाल सुरु होते. अन मग आपल्या आवडीच्या आपुलकीच्या क्षेत्रात आपण प्रवेश करावा अशी आपली  इच्छा असते. ज्या स्त्रियांना लग्नाआधी नौकरी असते अशांची तारांबळ उडून जाते. नौकारीमुळे नवं घर नवी माणसे ह्या सर्वांशी जुळवून घ्यायला एकतर वेळही कमी असतो. शिक्षण झाल्या झाल्या ज्यांचे संसार सुरु होतात त्या स्त्रियांनाही काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असतेच. एकच स्त्री भिन्न प्रकारच्या भूमिकातून कौटुंबिक व सामाजिक जीवन संतुलित राखण्याचा प्रयत्न करू शकते हि भावना आज घरोघरी रुजविली गेली असली तरी स्त्रीला  कौटुंबिक उंबरठा ओलांडून  सामाजिक जीवनात प्रवेश करताना दहादा विचार करावा लागतो. पुष्कळ लोकांच असं म्हणनं असतं  कि "पाण्यात पडल्यावर येत पोहता !!" पण आजच्या सुशिक्षित, संस्कारी स्त्रियांना अविचाराने घडलेली कृती कधीच नको असते. स्वकर्तृत्वाने मिळविलेल्या निर्लेप स्वातंत्र्यावर तिचा विश्वास असतो.

मुक्ती म्हणजे नसे स्वैराचार
मुक्ती म्हणजे नसे अविचार
मुक्ती म्हणजे नसे दुराचार
अविचाराने घडलेल्या स्वैराचारात लपतात सारे दुराचार
निर्लेप स्वातंत्र्य असती मुक्ततेत
स्वकर्तृत्वाची लाकिरे असती मुक्ततेत
निर्लोभी नेतृत्व असती मुक्ततेत
निर्लेप नेतृत्वातून मिळेल कर्तृत्ववान मुक्तता
मुक्त होण्या हवी मातृता
मंगळसूत्राची हवी सुसूत्रता
कंकणाची हवी हवी अखंडता
अखंड सुसूत्र मातृत्वाने मिळेल सार्थ स्वतंत्रता

प्रत्येक स्त्रीने अपेक्षिलेली अशी स्वतंत्रता जर तिला मिळाली तर तिच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटते. आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने आपल्या उद्दिष्टाप्रत जाताना आपल्याला अपयश आले तर आपल्या घरची माणसे आपल्याला समजून घेतील?? कोणतेही अपयश कायमचे असत नाहि , अपयश यशाचा विरोध नाहि तर विलंब सुचविते . अपयशाच्या पायऱ्यांनी यशाची शिडी निर्माण होते हे माहित असूनही आपण खचून गेलो तर??? याउलट यशाचं एकेक  दार उघडून समोर जात असताना आपल्या घरचं दार आपल्या पासून खूप दूर झालंय हे खूप उशिरा लक्षात आलं तर ?? स्वत:च्या पायावर उभं राहण्याच्या अभिमानात एकमेकांची अभीरुची जाणून घेण्याचा प्रयत्नच जर आपल्याकडून झाला नाहि तर ?? सर्व प्रश्न निष्क्रीयेप्रत नेणारे !! नको असलेली निष्क्रियता जपणारे !!
तेव्हढ्यात क्रियाशीलता मनाची दर ठोठावते, " निष्क्रिय सत्यच जर क्रियाशील असत्यासमोर टिकत नाहि तर निष्क्रिय स्त्रीचा टिकाव कसा आणि कुठे लागणार ??? लज्जा, स्नेह, प्रेम, दया,माया,ममता हे सर्व गुण स्त्रीच्या ठायी असतातच पण या स्त्रीगुणांसोबत विवेक , कर्तृत्व, पौरुष,निर्भयता या गुणांमधील "पुरुष" जागृत होताच ती धीर गंभीर दृढ सावित्री बनते, तिच्यातून रणचंडी लक्ष्मी प्रकट होते,कर्तृत्ववान अहिल्याबाई प्रकटते, पावित्र्याची मुर्ती सीता अग्निदिव्याला सामोरी जाते.