मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Thursday, November 20, 2014

बडे मिया दिवाने ऐसे न बनो

बडे मिया दिवाने ऐसे न बनो
हसीना क्या चाहे हमसे सुनो
लहानपणापासून कानावर आदळणारी हि आणि अशा सारखी गाणी नेहमीच मुलगी, महिला म्हणून आपल्या अस्तित्वाला कात्री लावणारीच वाटतात. खरंच आपल्याला काय हवंय किंवा नकोय हे कसं कळेल या लोकांना ?? आपल्या बद्दल जे बोलले जाते ती खरंच आपली आवड कि आपल्यावर लादलेली ती देखील.... जशा रूढी परंपरा या मोठ्या मोठ्या नावांखाली महिलांचे अस्तित्व दाबून टाकले जाते तसे ते अजूनही असल्या गाण्यांनी चिरडल्यासारखे वाटते. "मी एक स्त्री" म्हणून माझी ओळख काय ??? हे मी ठरवायचे कि माझ्यावर संस्कारांचे बीज म्हणून मी कशी असावी याचे नियम आजूबाजूच्यांनी करायचे... खरेच संस्कारी स्त्री म्हणजे कोण ??? अत्याचार सहन करणारी.... "अरे" ला "का रे" ने उत्तर न देणारी... मूकपणे होणारी मुस्कटदाबी सहन करणारी... हीच का संस्कारी आणि सहनशील आदर्श महिला ???
हीच जर आदर्श महिला असेल तर व्यर्थ ती जिजाऊमाता.... जिने प्राणप्रतिष्ठा करून शिवबा घडवला... व्यर्थ त्या झाशीच्या राणीचे बलिदान.... व्यर्थ ती अहिल्याबाई होळकर..... व्यर्थ सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आणि अनेक अशा माता भगिनी ज्यांनी प्रवाहा विरुद्ध जावून एक नवीन इतिहास घडवला...
हो मान्य आहे आजच्या स्त्रीला स्वातंत्र्य दिले जाते. पुरुषांच्या बरोबरीने वागविण्याचे निदान नाटक तरी केले जाते. अगदी उच्च पदस्थ स्त्रीचा सन्मानही केला जातो वेळच्यावेळी !! पण खरेच काम करतांना तिला स्वातंत्र्य दिले जाते ?? कधी बदलणार हि धारणा ??? बाईला "बाई"सारखे जगतांना होणाऱ्या यातनांची होईल कधी घटना तयार ??? घटनेने बदलेल साऱ्या जगाची मानसिकता??? अजूनही २१व्या शतकात हि सारी प्रश्ने अनुत्तरीतच !!
स्त्री मुक्ती म्हणजे काय ???
खूप दिवसांपासून मला एक प्रश्न पडतो.....  काही बायका "स्त्री मुक्ती.. स्त्री मुक्ती" म्हणून ओरडत असतात सारख्या... यांना नेमके काय हवे असते ??? म्हणजे पुरुषांना शिव्या देणे... कि त्यांची बरोबरी करणे ?? अरे ज्या निर्मात्यानेच पुरुष व बाईला वेगवेगळे निर्मिले आहे ते बरोबर कसे ?? वंशवृद्धी प्रत्येकाला हवीच असते मग ती बाई असो कि पुरुष.... आता मी असे म्हटले कि या खवळून उठणार .... कारण केजी तील मुलांसारखीच यांची अक्कल.... पण माझ्या दृष्टीकोनातून वंशवृद्धी म्हणजे कोणीही .... प्रत्येकाला एक अपत्य असणे मग ते मुलगा किंवा मुलगी कोणीही ... तर या अपत्य होण्याची एक प्रोसेस ... यात मग या मुक्तीवल्या स्त्रीयांना माझा एक प्रश्न... इथे दाखवा ना... समानता.... कशाला पुरुष हवाय वर चढ ??? समांतर होवून जावू द्या ..... 
माझ्या दृष्टीने बुरख्यातली ती बाईपण मुक्त आहे जी व्यसनी नवऱ्याला सोडून एखाद्या Beauty Parlour मध्ये १० हजाराची नौकरी करतेय आणि आपल्या दोन मुलांना वाढवतेय. माझ्यामते ती कामवाली बाई देखील मुक्त आहे जी नवऱ्याच्या मुस्कटात मारून चार घरची धुणी भांडी करतेय आणि आपले कुटुंब पोसतेय. माझ्या मते त्या डोक्यावर पदर घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीही मुक्त आहेत ज्या ३ महिन्यातून एकदा पहाटे भाजी बाजारात जमतात.... तेथील नेत्यांशी, गुंडांशी भांडून बाल मजुरांना मुक्त करून आश्रमात पोचवतात... एक एक करून महिन्यातून एकदा त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी उचलतात. माझ्या मते तरी या सर्व गृहिणी मुक्त आहेत ज्या आपल्या मुलांना त्यांच्या पॉकेट मनीतील काही भाग विधवा पेन्शनला द्या असे संस्कार त्यांच्यावर करतात. नुसते मॉड कपडे घालून समुद्राच्या काठावर बसून स्त्रीमुक्तीच्या कविता वाचणाऱ्या थोतांड गप्पा मारणाऱ्या काय मुक्ती घडवून आणणार ???

No comments:

Post a Comment