मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Monday, November 24, 2014

वैशाख

"रम्य ते बालपण" आपण नेहमीच असे म्हणतो. आणि मग हे वाक्य येताच तो भूतकाळ एखाद्या चित्रफितीसारखा आपल्या डोळ्यासमोरून सरकू लागतो आणि आपणही गालातल्या गालात हसत हसत चक्क मांडी ठोकून त्या बाल्यात जावून बसतो. कोणी आपल्याला रागावलं .... कि तेव्हा येणारा तो राग... आणि फुगलेले गाल कसे शांत करायचे हे काकू, आज्जी, आईला चांगलेच माहिती असायचे... रागावला न तो तुला... थांब त्याचे घर ना आपण उन्हात बांधू.. आणि मग रडक्या स्वरात त्याच वाक्याला कडकडून मिठी मारणारे आपले वाक्य.."बिना छपराचे !!" आणि मग पळून गेलेला राग आणि  आईच्या कुशीत शिरून खाल्लेला आंब्याचा रस आणि पोळी. 
तेव्हा कित्ती भीती वाटायची त्या बिना छपराच्या घराची.. कित्ती विचार होता ना... भर उन्हाळ्यात कोणी कसे काय राहू शकेल असल्या घरात... होरपळून निघेल ..... 
आता त्याच वाक्याची मजा वाटते... राहायला छप्पर तर आहे. तरीही कुठल्या वणव्याने होरपळतोय इथे प्रत्येक जण ??? न सहन होणाऱ्या उन्हाळ्यापासून वाचायला आपण घरातच राहतो... मग कुठल्या उन्हाची झळ आजही सतावतेय आपल्याला?? 
लहान असल्यापासून अगदी उन्हाची पर्वा न करता रात्रीपर्यंत खेळायचं आणि रात्र झाल्यावर गुडूप. मग कुलर असो वा नसो... आता तर दिवस रात्र ए सी !! तरीही का लागत नाही शांत झोप??
या सर्व प्रश्नाची उत्तरे सापडलीत तरी आपण निरुत्तरित असल्यासारखे जीवन पुढे ढकलतो. आणि मग त्या वैशाखाची विविधता शोधण्यापेक्षा त्याच्या वणव्यालाच कवटाळून बसतो.    
खरे तर हा वैशाख... वैविध्याने नटलेला, सुगंधित फुलांनी सजलेला, भगवान विष्णूचा सर्वात प्रिय महिना... वैशाख म्हटला कि त्याबरोबर वणवा हा आलाच.... मग हा वणवा तडपत्या उन्हाचा असो, मुलांच्या सुट्टीतील धुमाकुळाचा असो, प्रवासाचा असो, आंब्याचा असो, मदर्स डे चा असो, उन्हाळ्यामुळे बिघडणाऱ्या तब्येतीच्या काळजीचा असो,  ... सर्वच कसे आनंदाने हिरवळून निघणारे...  सृष्टीच्या या अभूतपूर्व छटेला दणदणीत सलाम !!

No comments:

Post a Comment