मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Monday, November 24, 2014

बाळूकाका

घरातील मोठ्या लोकांना आधारवड म्हणतात.... त्यांच्याच  सावलीत आपली जडण घडण झाली असते म्हणून असेल कदाचित.. घरातील नात्यांची सुरवात कधी होते ??? अजूनही न उमगलेला प्रश्न. जन्मापासून काकांची मी लाडकी असे घरचे सर्व म्हणतात. पण मला काका समजायला लागले तेव्हापासून ते माझ्या जीवनातील अविभाज्य घटक. लहानपणी काका हवेत ...का ??? तर लहान असल्याने कोणीच  खेळायला घेत नाहीत आणि त्याचवेळी मला वाईट वाटू नये म्हणून बाहेर घेवून जाणारे...  मला एकटीलाच चॉकलेट देणारे काका.... भांडता यायला लागल्यावर चूक असली तरी माझीच बाजू उचलून धरणारे काका, मी कारसेवेला अयोध्येला जाते म्हटल्यावर लगेच माझ्यासोबत येणारे काका, माझे साक्षगंध झाले तेव्हा काका संघाचे विस्तारक होते. काही कामानिमित्य नाही येवू शकले... एक सुंदरसा शेला देवून म्हणालेत हा शेला राहील न..... संघ म्हणजे काकांचा प्राण ... आणिबाणीत नौकरी गेली तेव्हा घरातील एकमेव कर्ते - कमावते. पण कधी असल्या दुय्यम गोष्टी त्यांना हलवू शकल्या नाहीत. नसानसात भिनलेला प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान. कधीही कोणी आपल्या शब्दाने दुखविल्या जाणार नाही याची घेतलेली खबरदारी.... जीवनातील प्रत्येक क्षणाचे आनंदाने स्वागत करणारे अविचल व्यक्तिमत्व.  
दु:ख accept केले कि वाईट वाटत नाही असे म्हणतात. मग हे दु:ख नाही कि मी त्याला accept केलेले नाही अजून..... काहीच कळत नाहीये....हे दु:ख होणार हे माहित होतं. आज नाहीतर उद्या या प्रसंगाला सामोरे जावेच लागणार ही तयारीही असेल कदाचित मनाची. पण एकदम असं हे कोसळल्यावर मन का खचलंय ?? कशात म्हणजे कशातच मन रमत नाहीये. शो मस्ट गो ऑन ... असं दहा वेळा बजावून झालंय.... तरी अनामिक हुरहूर, धडधड ..... काकाचं असण - नसण एखाद्या अदृश्य लहरींतून जिवंत होणाऱ्या आठवणी....

No comments:

Post a Comment